बोरपाडळे (श्रीकांत कुंभार) : कोरोनाने जगावर महाभयानक महामारीची आपत्ती आणली आहे. होत्याचे नव्हते करणारा रोग अनेकांच्या मनात धास्ती निर्माण करणारा ठरला आहे. पण याचा धसका न घेता काही कोरोना योद्धे पुढे येत विविध उपक्रम हाती घेताना दिसत आहेत. यामध्ये डॉक्टर्स, पोलीस, आशासेविका, शिक्षक, सामाजिक नेते आणि स्वयंसेवक सर्वजण लढत आहेत. वेगळे उपक्रम राबवत कोरोनाची जनजागृती करताना दिसत आहेत. शिवाय या परिस्थितीमुळे अनेकांना स्वत:च्या आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्वही समजले आहे.

शहापूर,ता.पन्हाळा येथील ४५ वर्षीय अनिल हिंदुराव मोरे हे शिक्षक,पत्रकार आणि कोरोना संदर्भात सेवा देत आहेत. हे सारे सांभाळत त्यांनी सध्याच्या बिकट परिस्थितीत सायकलिंगचा छंद जोपासला आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी बोरपाडळेसह, माले, केखले, जाखले, पोखले, कोडोली, वारणानगर, चिकुर्डे, अमृतनगर, मांगले, सातवे, आरळे, सावर्डे, पैजारवाडी, वाघबीळ आणि जोतिबा डोंगर अशा विविध ठिकाणी भेटी दिल्याची त्यांच्याकडे नोंद आहे.

गेल्या महिनाभरात सुमारे ५५० किमीचा सायकल प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. दररोज ते २० ते २५ किमी प्रवास करत जे भेटतील त्यांना कोरोनाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी गेल्यावर्षी उन्हाळी सुट्टीत ७५० किमी प्रवास केला असून त्यांच्या या सायकल प्रवासाबद्दल परिसरात चर्चा आहे. त्यांच्या या प्रयत्नाने परिसरातील अनेक युवक,शिक्षक आदी लोक सायकलिंगकडे वळले आहेत. जे मित्र किंवा पाहुणे भेटतील त्यांना स्वतःची काळजी घेत सायकलिंग आणि कोरोनाची माहिती देतात. तसेच त्यांची प्रशासनाला कोरोना युद्धात मदत होत असून पत्रकारितेतूनही ते सामाजिक भावना जपताना दिसतात.

शिवाय सध्या ते  “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानात समाविष्ट असून यामध्येही त्यांची सक्रियता महत्वाची आहे. सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छता करणे, गर्दीतील संपर्क टाळणे, आजारी असल्यास दवाखान्यात जाणे आदी सूचना ते देत आहेत.