रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविरोधातलं वक्तव्य अखेर भोवलं असून त्यांना वेळापूर्वी अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक केली असून संगमेश्वर पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली आहे.

नारायण राणे यांनी ‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती’, असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. नाशिक, पुणे, महाडसह अनेक ठिकाणांहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला होता. राणेंना दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली.

दिवसभरापासून नारायण राणेंच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती. इशारे-प्रत्युत्तर, आव्हान-प्रतिआव्हान, भाजप-सेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा असा बराच हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि अखेर राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, राणे समर्थकांकडून अद्यापही अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला जात नसून, त्यांना ताब्यात घेतल्याचंच ते म्हणत असल्याचं दिसत आहे. भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन निघाले. राणेंचा कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांची अटक अटळ ठरली.