नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आज (सोमवार) आठ आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहेत. यापैकी चार पूर्णतः नवीन आहेत. तसेच आरोग्य पायाभूत सुविधांविषयीचा एक घटक पूर्णतः नवीन आहे. सीतारामन यांनी कोरोना प्रभावित राज्यांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना घोषित केली आहे. यात आरोग्य क्षेत्रासाठी ५०, ००० कोटी रुपयांची तर इतर क्षेत्रांसाठी ६०००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी कमाल कर्ज रक्कम १०० कोटी, कमाल व्याज दर ७.९५ एवढा आहे, तर इतर क्षेत्रांसाठी व्याजदर ८.२५ एवढा असेल. या योजनांची व्याप्ती उद्भवणाऱ्या गरजा लक्षात घेता बदलत राहील. आपत्कालीन कर्ज हमी योजनेसाठी अतिरिक्त १.५ लाख कोटींची घोषणाही देखील त्यांनी केली. मे २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत पॅकेजचा भाग असलेली सदर योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सीतारामन यांनी सांगितले की, २५ लाख व्यक्तींसाठी सूक्ष्म वित्त संस्थांच्या माध्यमातून पत हमी योजना सुरु केली आहे. सुमारे २५ लाख कर्जदारांना अनुसूचित वाणिज्य बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी नवीन किंवा सध्या असलेल्या गैर-वित्तीय संस्थांच्या माध्यमातून १.२५ लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. किमान कर्जपुरवठा १.२५ लाख, आरबीआयने निर्धारित केलेल्या व्याजदरापेक्षा किमान २ टक्के कमी दराने करण्यात येईल. आता लक्ष नवीन कर्जपुरवठ्यावर आहे, याचा NPAs व्यतिरिक्त सर्व कर्जदारांना लाभ होईल. देशातील लहानात लहान कर्जदाराला लाभ व्हावा या उद्देशाने सुक्ष्म वित्त संस्थांसाठी नवीन पत हमी योजना जाहीर करण्यात आली आहे.