कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकासह शिक्षकांनी केलेल्या ओल्या पार्टीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत चौकशी समिती नेमून दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पन्हाळ्याचे गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना ही पार्टी भोवण्याची शक्यता आहे.

शिक्षकांनी शाळेतच मांसाहारी जेवणाचा बेत केल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांची पार्टी उधळून लावली होती. शिक्षक तांबड्या रस्यावर ताव मारत मांसाहारी पार्टीचा आस्वाद घेत  होते. यावेळी अचानक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शाळेत हजर झाल्याचे समजताच सर्वांची मात्र एकच भांबेरी उडाली. शाळेत हजर झालेल्या शिक्षकांनी  सुट्टीचा शीण घालविण्यासाठी मुख्याध्यापकासोबतच ओली पार्टी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणाची गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.