कोल्हापूर  (प्रतिनिधी)  : कोल्हापुरातील बालप्रेक्षकांना फुटबॉलचा महान खेळाडू पेले यांच्यविषयी रुपेरी पडद्यावर जाणून घेण्याची संधी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने आणली आहे. येथील शाहू स्मारक भवन येथे रविवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ‘द बर्थ ऑफ लिजंड : पेले’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

जगभरातील फुटबॉलचे चाहते २० नोव्हेंबरपासून सध्या कतारमधील फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धा पाहत आहेत. या स्पर्धेचा कोल्हापुरातील फुटबॉलचे असंख्य चाहते टीव्हीवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आनंद घेत आहेत, तर काहींनी थेट कतारही गाठले आहे.

पेले यांनी चारच दिवसांपूर्वी २३ नोव्हेंबरला ८२ वर्षे पूर्ण केले आहेत. जिवंतपणीच दंतकथा बनलेले ब्राझीलचे खेळाडू ‘पेले’ यांचा स्टार खेळाडू बनण्याचा प्रवास या चित्रपटात अतिशय सुंदर चित्रित केला आहे. हा सिनेमा काळा-गोरा वर्णभेदाचे बळी असणाऱ्या पेले यांनी अक्षरश: संडास साफ करण्याचे काम केले. आपल्या वडिलांकडून शिकलेली ‘झिंग’ किक पेले यांनी बायसिकल किक म्हणून जगभर प्रसिद्ध केली.

२०१६ मध्ये तयार झालेल्या या चित्रपटात स्वतः पेले यांनी छोटीशी भूमिका केली आहे. १९५८ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पेले यांनी ज्या तीन अप्रतिम गोलने संघाला जिंकून दिले त्या तिन्ही गोल जशाच्या तशा यात चित्रित केल्या आहेत. या चित्रपटाचे संगीत भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे. पेले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांचा खडतर प्रवास पडद्यावर पाहायला आणि ती जगप्रसिद्ध झिंगा किक रविवारी शाहू स्मारक भवन येथे पाहायला या, असे आवाहन चिल्लर पार्टीने केले आहे.