उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता

0
64

अहमदनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले होते. यावर टिप्पणी करताना उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते,  असे भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

विखे-पाटील म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे गर्वाने सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे. तसेच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत.  केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे, तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?  असा प्रश्न त्यांनी केला.