उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करत आहेत : ना. नारायण राणे

0
69

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जनता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नाही. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे, असा दावा करून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर आज (गुरूवार) तोफ डागली.

राणे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भाजपची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरु झाली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली.

दरम्यान, राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात होण्यापूर्वी विमानतळावर भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते, कार्यकर्ते   राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.