मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी गडावर येऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी केली होती. यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नियम तोडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या जवळच्या व्यक्तीलादेखील सोडत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

यावेळी संजय राऊत म्हणाले की, पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली. नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यावर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल कठोर आहेत. कायदा आपले काम करेल. कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असेही राऊत यांनी सांगितले. तर संजय राठोड यांच्याबद्दल मुख्यमंत्री अधिक बोलतील, असे सांगून यावर जास्त बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.