सातारा (प्रतिनिधी) : राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) साताऱ्यातील पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोत्यावर बसून हातात थाळी घेऊन भीक मागो आंदोलन केले. आणि लॉकडाऊनला कडाडून विरोध केला.

यावेळी उदयनराजे म्हणाले की, काहीही न करता उगाच लॉकडाउन कशाला, तुमच्या बापाची इस्टेट आहे का? त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. ज्यांना काही मिळत नाही, त्या लोकांनी काय करायचं? राज्यामध्ये ज्यांच्या मृत्यू झालाय, त्यामध्ये वयोवद्ध, ज्यांना आजार होता अशांचा समावेश आहे. जगाची रीत आहे. जो येतो, तो जातोच. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागतं. तब्येत चांगली ठेवली. प्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे. तुम्हीही कसंही वागता. सरकार लस पुरवू शकत नाही. आणि पैसे खाता. पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकरणात यांनी किती पैसे खाल्ले मलाही माहिती नाही. लोकांनी विचार केला पाहिजे, माझ्या एकट्याची जबाबदारी आहे का? जर राजेशाही असती, तर हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला.