पुणे (प्रतिनिधी) : मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. त्यांच्या विचारांशी सहमत आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हे एकच ध्येय आहे, उदयनराजे यांनी म्हटले आहे. पुण्यात आज (सोमवार) दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी राज्यकर्ते निर्माण करत आहे. त्यांना आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

मराठा आऱक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात, अशी टीका यावेळी त्यांनी केली. दम असेल तर अधिवेशन बोलवावं. आधी राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो. असंही त्यांनी म्हटले. राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला, असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.

दोन्ही छत्रपती घराण्यांना फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेट घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असं संभाजीराजेंनी या वेळी सांगितलं.