पुणे (प्रतिनिधी): राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथे आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असे उदयनराजे यांनी सांगितले.

शिवाय, आपण या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचही उदयनराजे यांनी जाहीर केले. राज्यपाल कोश्यारींवर कारवाई झाली नाही तर कमीत कमी शिवाजी महाराजांचे तरी नावही घेऊ नये, असाही आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. सोबतच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही त्यांनी आज पुन्हा एकदा आगपाखड केली.

उदयनराजे भोसले म्हणाले, ‘आज स्वार्थापोटी सर्व पक्ष, मग प्रादेशिक असो की राष्ट्रीय सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा वा मूर्ती असते. त्यांना अभिवादन केले जाते. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करतो, असेच सर्वजण म्हणतात. मग अशा पार्श्वभूमीवर विकृत विधान, चित्रीकरण यातून महाराजांची अवहेलना केली जाते. त्यांच्याबद्दल गलिच्छ चित्र निर्माण केले जाते, त्यावेळी राग कसा येत नाही. त्यांचे नाव घेता मग राग का येत नाही?”

‘तुमचे पक्ष वेगवेगळे असतील, तुमचे अजेंडे वेगवेगळे असतील, पण तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेता. मग हे विकृतीकरण थांबवत नसाल, तर छत्रपतींचे नाव का घेता. लहान मुलांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोडका तोडका इतिहास त्यांच्यापर्यंत गेला, तर त्यांना तेच खरे वाटेल. आपण कधी या सगळ्याची दखल घेणार?’ त्यांच्यासमोर आपण कोणता इतिहास मांडणार आहोत? असा सवाल उदयनराजे भोसलेंनी केला.