कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. कॉम्रेड अशोक जाधव व कॉम्रेड संजय तर्डेकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या. प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या अशा कायद्याच्या चौकटीत राहूनच पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी. पुनर्वसनापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळावा. प्रकल्पग्रस्तांना जमीन तातडीने द्यावी. प्रकल्पाला गेलेल्या जमिनीच्या बदल्यात सुपीक जमीन मिळावी.

यावेळी मुश्रीफ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच शुक्रवारी (दि.१०) प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन त्याचा परिपूर्ण अहवाल तयार करण्याच्या सूचनाही  दिल्या.

या बैठकीला आमदार राजेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, पंचायत समितीचे सभापती उदय पवार, सुधीर देसाई, अनिकेत कवळेकर, राजू होलम, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, सुरेश पाटील, धनाजी दळवी, प्रकाश मणकेकर, पांडुरंग धनुकटेकर आदी उपस्थित होते.