कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराविरोधात दिव्यांग सेनेच्या वतीने महापालिकेसमोर आज (गुरुवार)  लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाचा निधी खर्च करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. यासह दिव्यागांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना दरवर्षी हक्काचा निधी मिळावा, केएमटीमध्ये मोफत बससेवा मिळावी, दिव्यांगाकरता तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, काही सुविधांपासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांना लाभ मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष नारायण मडके, संपर्क प्रमुख विकी मल्होत्रा, तुकाराम हारुगडे, उत्तम चौगले, विनायक चौगले, शरद भोसले, अल्ताफ अत्तार, संजय आडके यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.