वाघबीळनजीक ट्रकच्या धडकेत कसबा बावड्यातील दोन तरुण ठार

0
988

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. रविवारी  मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे ( वय ३०, रा.रणदिवे गल्ली (पुर्व)),  विशाल आबासाहेब हाके  (वय २९,  रा. कवलापूर जि. सांगली)  अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघातामुळे  बावडा परिसरावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन व विशाल हे दोघे रविवारी रात्री ११ च्या सुमारास दुचाकीवरून विशाळगडकडे चालले होते. वाघबीळच्या पुढे आशिष लॉजच्या समोरील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने जोराची धडक दिली. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

विशाल याचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला असून तो बावडा येथे मामाकडे रहायला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली. नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून त्याला एक  लहान मुलगा आहे.