पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळ्यानजीक असलेल्या मसाई पठारावर फिरावयास आलेल्या तरुणांची स्विफ्ट कार (क्र. एमएच १२ जे एम ३९५६) घसरुन वेखंडवाडी गावाच्या बाजूस सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. पुष्पम लिगाडे (रा. लिगाडे मळा, कबनूर) आणि अमित सुरेश गुप्ता (वय ३०, रा. कबनूर, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेला निखिल युवराज शिंगे हा गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार आज (शुक्रवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

कोडोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिगाडे, शिंगे आणि गुप्ता हे इचलकरंजीनजीक असलेल्या कबनूर येथील राहणारे आहेत. हे तिघेही आज मसाई पठारावर पर्यटनासाठी आले होते. आज सायंकाळी सहाच्या सुमारास ते घरी परतण्यासाठी निघाले. कार रिव्हर्स घेताना चालकाचा ताबा सुटून घसरुन वेखंडवाडी गावच्या बाजूस सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये पुष्पम लिगाडे याचा जागीच मृत्यू झाला. अमित आणि निखिल हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताचे वृत्त समजताच तिथे गर्दी झाली. वेखंडवाडी येथील पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, त्यांचे बंधू सरपंच उत्तम कंदूरकर व काही तरुणांनी धाव घेत गाडी बाहेर काढली. कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणांना कोडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना अमित गुप्ता याचा काही वेळापूर्वी मृत्यू झाला आहे. निखिल याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. दोन्ही तरुणांच्या मृत्यूने इचलकरंजीसह कबनूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.