पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील ४२ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) पार पडली. यात २५ ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाचा झेंडा फडकला आहे.  आरळे आणि पुशिरे तर्फ बोरगांवमध्ये महिला उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून सविता महापुरे, अनिता पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले.

कोडोली येथे जिल्हा परिषद सदस्य व माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत. आरळे येथे सविता महापुरे व कादंबरी मोरे या महिला उमेदवारांना ३४९ समान मते पडली. या ठिकाणी चिठ्ठीवर सविता महापुरे विजयी झाल्या. तर पुशिरेतर्फे बोरगांवमध्ये सुध्दा अनिता पाटील व माधुरी दबडे यांना २०६ समान मते मिळाली. या ठिकाणी चिठ्ठीवर अनिता पाटील विजयी झाल्या. दरम्यान, कळे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांची गेल्या दहा वर्षापासून एकहाती सत्ता आहे. यावेळी १५ पैकी केवळ ८ जागांवर त्यांना निसटता विजय मिळवता आला. तर ७ जागा जनसुराज्य पक्षाला मिळाल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा दिल्या.