कोल्हापूर (प्रतिनिधी) : एस.टी. बसमधून उतरणाऱ्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे ८ लाख रु किमतीचे १७ तोळे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नकुशा बाबासो सकट (वय ४५, मानेनगर, गणेश फौंड्रीमागे, रुई) आणि सुभद्रा कल्लाप्पा चौगले (वय ५७, शिवाजी तालीमजवळ हातकणंगले) अशी अटक केलेल्या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत. ही कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली.

तानाजी बापू सावंत (वय ७०, सध्या रा. कौलव, ता. राधानगरी) आणि त्यांची पत्नी लता सावंत (वय ६५) हे दोघे दसऱ्यानिमित्त काळम्मावाडी (ता. वाळावा) येथे जाण्यासाठी राधानगरी ते इचलकरंजी बसने प्रवास करत होते. बस कोल्हापूर बसस्थानक येथे आल्यानंतर हे जोडपे गाडीतून खाली उतर असताना लता सावंत यांच्या काखेतील बॅगेची चेन काढून त्यातील सुमारे ८ लाख रु किमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी दोन चोरट्या महिलांनी लंपास केली. याबाबत तानाजी सावंत यांनी फिर्याद दिली होती.

गुन्हे शोध पथकास हातकणंगले येथील दोन चोरट्या महिलांनी चोरी केल्याची माहिती मिळाली होती. हातकणंगले येथे तपासात या महिलांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु सखोल चौकशीत त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. ही कारवाई शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकांत इंगवले, हे. कॉ. ऋषीकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, राहुल कांबळे, महिला पोलीस सविता सुतार यांनी केली. या शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस प्रमुखांनी १० हजार रुपयाचे बक्षीस दिले.