कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्या महिलांना शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलांनी २० मार्च २०२१ रोजी शाहुपुरी पहिल्या गल्लीतील जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे कार्यालय फोडून ३० हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचं निष्पन्न झालंय. अश्विनी दत्ता नाईक (वय ३०) व सीमा सुरेश पांडागळे (वय ३५,  दोघी रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे असून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबद्दल दत्तात्रय बळवंत पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  शाहूपुरी पहिल्या गल्लीतील जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेत काम करणारे दत्तात्रय पाटील हे २० मार्च २०२१ रोजी संध्याकाळी कार्यालय बंद करून निघून गेले होते. २१ मार्च रोजी ते कार्यालयात आले असता संस्थेतील रग, चादरी, गालीचा आणि इतर वस्तू अशा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाटील यांनी याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या महिलांना अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीचा मुद्देमाल पोलीसांना परत दिला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, प्रशांत घोलप, युवराज पाटील, दिग्विजय चौगले, दिगंबर पाटील यांनी केली.