कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आरळे येथे कराड शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला आज (शनिवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आकाश उर्फ सोन्या आनंदा पाटसुपे (वय २८, रा. मुजावर कॉलनी, मार्केट यार्ड, ता. कराड, जिल्हा सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजारांच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना पन्हाळा तालुक्यातील आरळे परिसरात आकाश पाटसुपे हा संशयीतरित्या फिरताना आढळला. त्यामुळे त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीच्या दोन हिरो स्प्लेंडर, दोन यामाहा मोटरसायकल अशा एकूण २ लाख १० हजारांच्या ५ मोटरसायकली मिळून आल्या.

दरम्यान, या मोटरसायकली सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून चोरल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे कराड पोलिसांशी संपर्क साधला असता कराड शहर पोलीस ठाण्यात या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याने आरोपी आकाश पाटुसुपे याला मुद्देमालासह कराड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक फौजदार विजय गुरखे, हिंदुराव केसरे, सहा. फौजदार चंदु नन्नवरे, सचिन देसाई, वसंत पिंगळे, कृष्णात पिंगळे, दिपक घोरपडे, सोमराज पाटील यांनी केली आहे.