सेनापती कापशी (प्रतिनिधी) :  सेनापती कापशी परिसरासाठी वरदान ठरणारे चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आरळगुंडी पठारावर आणखी दोन बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्या द्वारे हे पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळविण्यात येईल, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

आरळगुंडी पठारावरील पावसाचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी चिकोत्रा धरणामध्ये आणखी कसे वळवता येईल. धरण दरवर्षी १०० टक्के भरण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बंधारा साईटची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,  पहिल्या टप्यातील बंधाऱ्यास येणारा २७ लाखांचा निधी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने व आमच्या पाठपुराव्याने मंजूर झाला. त्यापैकी मागील वर्षी आरळगुंडीचे पठारावर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे मागील वर्षी चिकोत्रा धरण १०० टक्के भरण्यास मदत झाली. उर्वरित दोन चरी आता खोदण्याचे व त्या बंधाऱ्याच्या बाजूलाच दुसरा बंधारा बांधण्याचे आम्ही या उन्हाळ्यात नियोजन केले आहे. 

जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,  संजय बरकाळे, सागर मोहिते, वनविभागाचे वनक्षेत्रपाल के. एस. आहेर,  वनपाल के. एच. पाटील, वनरक्षक किरण पाटील, वर्षा तोरसे, प्रियांका एरुडकर,  दत्तात्रय जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 कित्ता शाहूंच्या जलनिती अन्‌ कर्तृत्वाचाही..!

समरजितसिंह  घाटगे यांनी चिकोत्रा धरण भरण्यासाठी अडथळे ठरू शकणाऱ्या मुद्यांसह करावयाच्या उपाययोजनांबाबत व भविष्यात कायमस्वरूपी हे धरण भरण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत धरणस्थळी रणरणत्या उन्हात पायपीट करत पाहणी केली. कोणतेही लोकहिताचे काम करत असताना छत्रपती शाहू महाराज ज्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करीत व निर्णय घेत असत. त्यांच्या जनक घराण्याचे वारसदार असलेले घाटगे त्यांचेच अनुकरण करत आहे. शाहूंच्या जलनीतीसह कर्तृत्वाचाही कित्ता गिरवित आहेत, याची चर्चा उपस्थितामध्ये होती.