आजऱ्यात दोन घरांना आग, साडेपाच लाखांचे नुकसान

0
36

आजरा (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवस्तीमधील सुतार गल्लीत मरगुबाई मंदिराशेजारच्या दोन घरांना शनिवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये सुतार बंधूंच्या मशीनरीसह तयार केलेल्या फर्निचर, घराचे आणि प्रापंचिक साहित्य मिळून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील नरेंद्र मनोहर सुतार यांच्या वर्कशॉपबरोबरच अमर शिवाजी सुतार आणि हणमंत सुतार या सुतार कुटुंबीयांच्या घरांना आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे गडहिंग्लमधील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये सुतार कुटुंबीयांचे प्रापंचिक साहित्य, मशिनरी, तयार फर्निचर यासह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. याबाबतची माहिती मिळताच आजरा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज आहे.

या दुर्घटनेतील सुतार कुटुंबीयांच्या मदतीसाठी रवळनाथ हौसिंग फायनान्स या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले आणि उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, संचालक महेश मजती यांनी तातडीने आजरा येथे जाऊन सुतार कुटुंबीयांची विचारपूस करीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घर उभारणीसाठी तत्परतेने २५ हजार रुपयांची मदत देऊ केली. चौगुले म्हणाले, यापूर्वीही संस्थेने अनेक गरजू व गरीब कुटुंबीयांना विविध आपत्तीमध्ये वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी भरीव स्वरूपाची मदत केली आहे. यावेळी संस्था पदाधिकाऱ्यांसह गौतम सुतार, शिवाजी सुतार, आजरा शाखाधिकारी संभाजी हरेर आदी उपस्थित होते.