सोलापूर (प्रतिनिधी) : राज्यात ठाकरे सरकार कोसळून सत्तांतर झाल्यानंतर १५ जिल्ह्यांमधील २३८ ग्रा.पं. मध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान पार पडले होते. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रा.पं.च्या निवडणुकीत शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

सोलापूरच्या चिंचपूर ग्रा.पं.मध्ये शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. याठिकाणी शिवसेनेच्या ७ पैकी ७ उमेदवारांचा विजय झाला आहे, तर दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रा.पं.मध्येही भाजपच्या सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. मनगोळी ग्रा.पं.मध्ये गेल्या १५ वर्षांपासून सुभाष देशमुख गटाची सत्ता होती. यंदा मनगोळी ग्रा.पं.मध्ये सहापैकी केवळ एका जागेवरच सुभाष देशमुख पॅनलचा उमेदवार विजयी झाला. माढा तालुक्यातील म्हैसगाव ग्रा.पं.वर आमदार बबनराव शिंदे समर्थक तथा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ यांच्या गटाची सत्ता कायम राहिली आहे. दुसरीकडे मात्र पडसाळी ग्रा.पं. निवडणुकीमध्ये प्रताप पाटील यांच्या गटाचा पराभव झाला आहे.