कतार (वृत्तसंस्था) : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीमध्ये चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. यातील एका लढतीत फुटबॉल चाहत्यांना दोन मित्र आमने सामने लढताना दिसणार आहेत. ब्राझीलला बाहेरचा रस्ता दाखवणारा क्रोएशिया अर्जेंटिनाविरुद्ध काय कमाल करणार हे पाहावे लागेल. चारही संघ आता फिफा वर्ल्डकपपासून फक्त दोन पावले दूर आहेत.

फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीची लाईनअप निश्चित झाली आहे. क्रोएशिया, अर्जेंटिना, मोरोक्को आणि फ्रान्सने उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. यामध्ये मोरोक्को हा पहिलाच आफ्रिकी देश आहे ज्याने पहिल्यांदाच उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. मोरोक्कोने अशी कामगिरी करत इतिहास घडवला आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये दुसरा उपांत्य सामना मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील तेव्हा दोन मित्रही आमने-सामने असतील. मोरोक्कोचा अशरफ हकिमी आणि फ्रान्सचा एम्बाप्पे हे दोघेही आपआपल्या संघाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. याशिवाय दोघेही एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. फ्रान्सचा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचताच हकिमीने ट्विटरवर एम्बाप्पेला मित्रा लवकरच भेटू, असे म्हटले आहे.