कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. या कामासाठी २०२१-२०२२ च्या दुसऱ्या टप्प्यात एक कोटी रुपये मंजूर झाले असून तर जिल्हयात पर्यटन विकासासाठी एकूण २ कोटी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

राज्य सरकारने रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन करणे, रंकाळा परिसर विकसित करणे, यासाठी सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये निधी शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपये मंजूर झाले होते तर दुसऱ्या टप्प्यात १ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

या निधीमधून रंकाळा तलावाचा प्रमुख भाग असलेल्या टॉवरचे जतन व संवर्धन केले जाणार आहे. रंकाळा तलावाच्या सभोवतीच्या नादुरुस्त झालेल्या लहान दगडी भिंतींची दुरुस्ती, रंकाळा तलाव येथील उत्तरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती ,रंकाळा तलाव येथील संध्यामठ आणि धुण्याची चावी याचे जतन व संवर्धन आदी कामे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विजयमार्ग परिसराचे सुशोभीकरण करणे या परिसरात नदीघाटाचा विकास, प्रसाधनगृह करण्याबाबत २० लाख रुपये निधी मंजुरी मिळाली आहे. तर  ज्योतिर्लिंग चौक सुधारणा करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत. कागल तालुक्यातील बिद्री येथील विठ्ठलाई मंदिर परिसरात विकासासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र बाहुबली येथे नळ पाणी पुरवठा करण्यासाठी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.