विद्युत तारेस स्पर्श झाल्याने दोन बैल ठार

0
217

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे विद्युत तारेस  स्पर्श झाल्याने दोन बैल ठार झाले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

राजाराम नाईक या शेतकऱ्याच्या शेतामधील पिकांची नासधूस मोकाट जनावरांकडून केली जात असल्याने नाईक याने शेतातील कूपनलिकेच्या विद्युत पेटीतून कनेक्शन घेऊन शेताच्या कडेला लावलेल्या तारेच्या कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. शुक्रवारी पहाटे मोकाट सोडलेले दोन वळू या कुंपणाजवळ आल्याने त्यांचा तारेला स्पर्श झाल्याने दोन्ही वळूंचा जागीच मृत्यू झाला. दोन बैल ठार झाल्याची माहिती समजतात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. शेतकऱ्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दत्तवाड महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून, त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे दत्तवाड महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता रवींद्र पाटील यांनी सांगितले. या प्रकारामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबतची तक्रार कुरुंदवाड पोलिसांत करण्यात आली आहे.