चंदगड (प्रतिनिधी) : धुमडेवाडी येथील ताम्रप्रणी नदीच्या काठावर दोन म्हैशी आणि एक गाय चरायला गेल्या होत्या. अचानक त्यांना उघड्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. यामध्ये त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. ही दुर्देवी घटना आज (सोमवार) घडली.

ताम्रपर्णी नदीच्या काठावर विजेचा खांब वाकलेल्या अवस्थेत उभा आहे. या खांबाच्या विजेच्या तारा जमिनीपासून थोड्याच अंतरावर वाकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. आज संध्याकाळी ही जनावरे चरायला गेली असता त्या वीजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे माजी पोलीस पाटील सुभाष रामचंद्र पाटील यांची अंदाजे ८० हजार रुपयांची किमतीची म्हैस आणि राजीव जकाप्पा पाटील यांची अंदाजे ७० हजार रुपये किंमतीची म्हैस आणि ८० हजार रुपये किंमतीची गाय मृत्यूमुखी पडली. या घटनेत जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

यावेळी चंदगड एमएसईबी अभियंता विशाल लोधी, हलकर्णी येथील कनिष्ठ अभियंता कांबळे,  पाटीलस ग्रामसेविका विद्या भोस, पशुवैद्यकीय अधिकारी आणि धुमडेवाडीचे पोलिस पाटील मोहन पाटील उपस्थित होते.