कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील हासूर बुद्रुक येथे शेतीच्या किरकोळ वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी दोघा भावांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. साताप्पा पुंडलिक नरतवडेकर (वय ४६) व त्याचा दत्तक भाऊ सुधीर लक्ष्मण बोटे (वय २९, दोघेही रा. हासूर बुद्रुक ता. कागल) आरोपींची नावे आहेत. हा प्रकार २०१७ साली घडला होता. विशेष म्हणजे मयत व फिर्यादींची दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात सेवा बजावत आहेत.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी श्रीमती छाया केरबा बोटे यांचे व आरोपींचे शेळप नावाचे शेत एकमेकांना लागून आहे. छाया व त्यांचे पती केरबा बोटे हे १४ एप्रिल २०१७ रोजी दुपारी ३ वा.  गेले होते. त्याचवेळी साताप्पा नरतवडेकर हा त्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने सपाटीकरण करुन बांधावर माती ओढत असताना माती बांधावरून खाली येऊन छाया बोटे यांच्या रानात पडली. त्यामुळे शोभा यांनी आरोपी सुधीर बोटे याला तुमची माती काढून घ्या नाहीतर आमच्या रानात विस्कटू काय, अशी विचारणा केली असता त्याने त्यांना रानातील ढेकळे, दगडे मारली. त्यामुळे छाया व केरबा शेतातून बाहेर पडून गावाकडे चालले असता वाटेतच केरबा बोटे यांना आरोपींनी धक्का देऊन खाली पाडले आणि डोक्यात काठीचे प्रहार केले. त्यानंतर केरबा बोटे यांना गडहिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना केरबा बोटे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे छाया यांनी आरोपींविरोधात मूरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सरकारी वकील म्हणून अॅड. मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आजन्म कारावासासह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.