कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथे सांबरसदृश प्राण्याचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस व वनविभागाने संयुक्तरीत्या कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून स्नॅपर रायफलही ताब्यात घेण्यात आली आहे. शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बेंगळुुरू) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

तुडीये-कोलिक रोडवर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे हे रात्रगस्त करत असताना एका पोल्ट्रीजवळ १० ते १२  जण चार वाहनांसोबत संशयास्पद स्थितीत आढळून आले. यावेळी त्यांची चौकशी केली असता सर्वांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामधील दोघांना ताब्यात घेण्यात आले. एका संशयिताकडे स्नॅपर रायफल आढळून आली.

एका वाहनामध्ये वन्य प्राण्याचे मांस मिळून आल्याने वन विभागाचे अधिकारी प्रशांत आवळे, वनक्षेत्रपाल पाटणे यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून वाहनाची तपासणी केली. सांबरसदृश प्राण्याचे मांस आळल्याने दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या घटनेतील आरोपींची आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता वर्तवत तपास सुरु केला आहे.