कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओएलएक्स ॲपवर विक्रीसाठी जाहिरात केलेली बुलेट ट्रायल घेण्याच्या बहाण्याने पळवली. तसेच खोटा चेक देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. नरेंद्र करसण पटेल (रा. कोल्हापूर), पिंटू राजपूत उर्फ जितेंद्र (रा. उचगाव) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नांवे आहेत.

या प्रकरणी सुशांत अनिल ढणाल (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर दोन आरोपी कोल्हापूर शहर व उपनगरामध्ये चारचाकी आणि दोनचाकी वाहने विक्री करणाऱ्या लोकांच्याकडून वाहने खरेदी करण्याचा बहाणा करून बनावट सहीचे चेक द्यायचे. तसेच ट्रायल करिता वाहने घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करत. दरम्यान, या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांना पकडण्यात यश आले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी ३ मोटरसायकल ३ चारचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३ मोटरसायकल ३ चारचाकी गाड्या असा एकूण २२ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.