दानपेटीतील रोकड, सुताची बाचकी चोरणाऱ्या दोघांना अटक

0
33

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील मथुरानगरमधील शिवमंदिरातील दानपेटीमधून रोख रक्कम व इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कारखान्यातून सुताची बाचकी चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून रोख रकमेसह एकूण १ लाख ४५ ह्जार ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मथुरानगर येथील शिवमंदिरात तीन दिवसांपूर्वी दानपेटी तोडून रोख रक्कम चोरल्या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयित आरोपी नारायणमळा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून सराईत गुन्हेगार दीपक चंद्रकांत कांबळे (वय ३१, रा. लालनगर, इचलकरंजी) व अजय विजय महाजन (वय ३० रा. मासाळ गल्ली, जवाहरनगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी २,५०० रुपयाची रोकड जप्त करण्यात आली.

या दोन संशयित आरोपींनी आणखी एक साथीदार नागेश हणमंत शिंदे (रा. कोरोची ता. हातकणंगले) याच्यासह १५ दिवसांपूर्वी पंचवटी टॉकीजच्या पिछाडीस बंडगर मळा येथून एक टाटाचा छोटा हत्ती टेम्पो (एमएच ११ बी.एल.३७१३) हा बनावट किल्लीचा वापर करुन या टेम्पोतून इंडस्ट्रीयल इस्टेटमधून एका कारखान्यातून सुताची बाचकी त्यांनी लंपास केली. तपासात पोलिसांनी १ लाख ३३ हजार ७३५ रुपये किमतीची ८ सुताची बाचकी व ९७०० रुपये किमतीचे कापडाचे २ तागे असा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दीपक कांबळे याच्यावर जबरी चोरी, घरफोडा व इतर चोरीचे १३ तसेच आरोपी नागेश शिंदे याचेवर चोरी घरफोडीचे २९ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक, जयश्री देसाई व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे व पोलीस अंमलदार बालाजी पाटील, फिरोज बेग, संभाजी भोसले, प्रदीप पवार, रवींद्र कांबळे, अनिल पास्ते व ‘सायबर’चे सचिन बेंडकळे यांनी केली.