कुंभोज (प्रतिनिधी) : अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखर सर करणारी नेज, ता. हातकणंगले येथील अन्वी घाटगे ही सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. अन्वी अवघी अडीच वर्षांची आहे.

तिने नगरमधील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने हा विक्रम केला. अवघ्या ३ तासांमध्ये हे अंतर पूर्ण केले. तिचा ट्रेक यात्रीकडून प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे तेजस स्वामी, रवींद्र चोभे, अक्षय भापकर, बारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अन्वीचे कौतुक केले.

अन्वीची आई अनिता घाटगे यांनी ट्रेक यात्रीचे तेजस स्वामी यांच्याजवळ अन्वीद्वारे महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अन्वीने यापूर्वी पुण्याजवळील ट्रेक, पन्हाळा पावनखिंड, १३ कि.मी. वेसरफ ते जंगल ट्रेक, नेज, मजले, शिवगड तसेच पोहाले जांभा रॉक क्लाइबिंगही केले आहे. अन्वीचे वडील चेतन व आई अनिता घाटगे तसेच ट्रेकयात्री संस्थेने अन्वीला प्रोत्साहन दिले आहे.