कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांनी मंदिर-मशिदी बांधल्या नाहीत. कारण त्यांना धार्मिक संस्थाने उभारायची नव्हती. त्यांना बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे होते. लोकराजा शाहू छत्रपतींनी बारा बलुतेदार आणि बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे उभारली. त्यांच्या या कार्याची माहिती शालेय वयातच मुलांना देण्यासाठी शिक्षकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

शाहू छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाचे औचित्य साधून आयोजित राजर्षी शाहू राज्यस्तरीय आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण समारंभ शाहू स्मारक भवनात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयसिंगराव पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. जॉर्ज क्रुझ हे होते.

या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार डोळ्यासमोर ठेवून विद्यादान करणारे पंधरा शिक्षक आणि राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या तत्वानुसार क्रीड़ा, संस्कृती, संशोधन, शेती, सामाजिक कार्य या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पाच व्यक्ती, संस्था यांना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

आजमभाई जमादार, चंद्रकांत कांडेकरी, प्रा. डॉ व्ही. के. गरांडे, महेश धींग, सुषमा गर्दे आदी प्रमुख उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांच्या वतीन प्रा. राजेंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन संस्थेचे संस्थापक सचिव जावेद मुल्ला, छाया साळुंखे, संचालक नवाब शेख यांनी केले. सूत्रसंचालन पूजा मोटे-खांडेकर यानी केले.