गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हरळी (ता.गडहिंग्लज) येथील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे बेजबाबदार व मनमानी कारभार करीत आहेत. संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याच्या कारणावरून कारखान्याच्या बारा संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर विभाग यांचेकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

कारखान्याचे चेअरमन यांनी चालू हंगामात कारखाना चालू करण्यापूर्वी सर्व संचालकांना विश्वासात न घेता कारखाना चालू केला. इतका विलंबाने कारखाना चालू करतेवेळी सभासदांचे फायदे तोटे विचारात घेऊन चालू करावयास पाहिजे होता. परंतु तसे न करता कारखाना चालू केला. अध्यक्षांच्या कारभारामुळे सर्व सभासद आणि कारखान्याचा फार मोठा आर्थिक तोटा होणार आहे. कारखान्याचे चेअरमन नेहमीच बेजबाबदारीने व मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. यामुळे आम्ही आप्पासाहेब नलवडे तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. प्रकाश श्रीपाद शहापूरकर, प्रकाश भीमराव चव्हाण, सतीश भीमगोंडा पाटील, विद्याधर बाबुराव गुरबे, दीपक भैय्यासो जाधव, प्रकाश धोंडीराम पताडे, आनंद नारायण कुलकर्णी, सुभाष नारायण शिंदे, सदानंद राजकुमार हत्तरगी, किरण मलगोंडा पाटील, जयश्री सचिन पाटील, क्रांतीदेवी किसनराव कुराडे अशा बारा संचालकांनी आज प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर विभाग यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.