कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूपुरी पोलीस ठाण्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकादेशीर शस्त्र बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

तुषार अरुण चव्हाण (वय २६, रा. शाहूपुरी ५ गल्ली, कोल्हापूर) असे हद्दपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आरोपी तुषार चव्हाण याच्यावर  दुखापत, गर्दी जमवणे, मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकादेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये कारवाई करुन करवीर प्रातांधिकारी वैभव नावडकर यांच्या कडे हद्दपारीचा प्रस्ताव  पाठविला होता. त्यानुसार बुधवारी तुषार चव्हाण याच्यावर दाखल असलेले ५ गुन्हे व त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून त्याला २ वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रातांधिकारी यांनी पोलिसांना दिले.

ही कारवाई शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस नाईक युवराज पाटील यांनी केली.