कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ज्यादा परताव्याच्या अमिष  दाखवून हजारो ठेवीदारांची  करोडो रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हिजन अॅग्रो कंपनीचा संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (वय ४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) याला गुन्हे अन्वेषण शाखेने काल (सोमवार) रात्री उशिरा अटक केली. त्याला आज (मंगळवार) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील विकास खुडे आणि त्याची पत्नी प्रज्ञा खुडे यांच्यासह अन्य संचालकांनी मिळून कोल्हापुरात व्हिजन अॅग्रो नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून सुशिक्षित, बेरोजगार तसेच अन्य हजारो लोकांच्याकडून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांच्या ठेवी घेतल्या होत्या. मात्र, परतावा आणि मुद्दल त्याने ठेवीदारांना परत दिली नाही. त्यामुळे ठेवीदारांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती. व्हिजन अॅग्रो  कंपनीचा विकास खुडे यांच्यासह सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने या फसवणूक प्रकरणी संचालक सुशील पाटील याला अटक केली आहे. त्यानंतर मुख्य सूत्रधार विकास खुडे यालाही अटक केली होती.

या प्रकरणातील व्हिजन अॅग्रो कंपनीचा संचालक तुकाराम पाटील हा काल रात्री पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांना मिळाली होती. त्यानुसार इंदलकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी सापळा रचला. कोतोली फाटा येथे आलेल्या तुकाराम पाटील याला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तुकाराम पाटील याच्याकडून २३  तोळे सोने, दोन आलिशान कार, मोटर सायकल, लॅपटॉप कॉम्प्युटर आता सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर व्हिजन अॅग्रो कंपनीचा संचालक प्रसाद आनंदराव पाटील हा अद्यापही फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.