आजरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला जिल्ह्यातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत’ गोकुळ’ मध्ये परिवर्तन अटळ आहे. तालुक्यात शिंपी गटाची ताकद पाहता त्यांच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी आज (रविवार) येथे केले. आजरा तालुक्यातील साळगाव येथे आयोजित शिंपी गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य जयवंतराव शिंपी होते.

\आमदार आसगावकर म्हणाले की, गोकुळ दूध संघ सर्वसामान्य दूध उत्पादक यांच्या मालकीचा रहावा, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ  प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीत ज्यांच्याकडे जास्त ठराव त्यांना उमेदवारी देण्याचे नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे येथील ठराव धारकांची उपस्थिती पाहता शिंपी गटाला उमेदवारी देण्यात काहीच अडचण येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत शिंपी गटाला गृहीत धरले जाते. आणि ऐनवेळी गटाला बाजूला टाकले जाते. भिकाजी गुरव, सुभाष देसाई, सरपंच शिवाजी नांदवडेकर, धनंजय देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बशीर खेडेकर, आप्पासाहेब देसाई, मधुकर येलगार, उत्तम देसाई, के.बी.कुंभार, मनोहर जगदाळे, बाळासाहेब तर्डेकर, एस.पी. कांबळे, विलास पाटील, किरण कांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सुनिल शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विक्रम पटेकर यांनी आभार मानले.