रांगोळी येथे ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक : एक गंभीर

0
618

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथील माळभाग रस्त्यावर आज (गुरुवार)  ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रक चालक अशोक लोहार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर मार्गावर बराचवेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

इचलकरंजीकडे जळाऊ लाकूड भरून घेऊन जाणारा आयशर ट्रक क्र. (एम. एच. १०-४१३५) आणि हुपरीकडे जाणारा डिलीशिएस दुध डेअरीचा टेम्पो क्रमांक (एम. एच. ७१६४) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. तर क्लिनरला किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले आहे. लाकडाने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्यामुळे खूप नुकसान झाले. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, नागरिकांनी जेसीबी मशिनच्या सहय्याने पलटी झालेला टेम्पो  बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या मार्गावर दोन साखर कारखाने असल्यामुळे वाहनांची वर्दळ जास्त आहे.  रांगोळी ते माळभाग याठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी वाढवावी, अशी मागणी नागरीक आणि वाहनधारकांनी केली आहे.