पुणे (प्रतिनिधी) : नवले पुलाजवळ ४७ वाहनांना धडक देणाऱ्या ट्रक चालकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रविवारी सातारा येथून भरधाव वेगाने मानिराम यादव हा (एपी ०२ टीई ५८५८) ट्रक घेऊन वेगाने निघाला होता. खेडशिवापुर बोगदा ओलंडल्यावर उतारावर यादव याने ट्रक बंद करत न्यूट्रल केला होता. तीव्र उतारामुळे ट्रकचा वेग वाढला. हा ट्रक नवले पूल या ठिकाणी येताच यादव याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तब्बल ४७ वाहनांना उडवले.

या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने मदत न करता फरार झाला. यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर आज ट्रक चालकाला चाकणमधून मनीराम यादव याला ताब्यात घेतले आहे.