नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडीने कामाचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांच्या संख्येत तिपटीने वाढ करण्याची मागणी ईडीकडून केंद्र सरकारकडे केली आहे. ईडीने केलेली ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्यास ईडी ही देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशात चर्चेत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेने देशभरातील अनेक राजकीय नेत्यांसह भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ईडीवरील कामाचा बोजा वाढला आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली आहे.

सध्या ५ हजार ८०० अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह सीबीआय ही देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे; पण ईडीच्या फौजेत आणखी ३ हजार ३०० अधिकारी दाखल झाल्यास ईडीच्या अधिकाऱ्यांची संख्या वाढणार असून, ती सर्वात मोठी तपास यंत्रणा होऊ शकते. ईडीकडील खटल्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ईडीकडे सध्या असलेल्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. सध्या ईडीकडे एकूण २१०० अधिकारी आहेत. पण कामाचा भार लक्षात घेता ईडीला आणखी ३ हजार ९०० अधिकाऱ्यांची गरज असल्याचा प्रस्ताव ईडीने केंद्र सरकारला पाठवला आहे.