कोल्हापूर (प्रतिनिधी) : मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड, फळबाग लागवड कार्यक्रमाला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यास राज्य सरकारच्या नियोजन विभागाने ( रोहयो) मंजूरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

यावर्षी अतिवृष्टी, कलमी रोपांची अनुपलब्धता, शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्यास झालेला विलंब, ऑनलाईन करणं प्रलंबित असणं आणि चांगला पाऊस झाल्याने मार्चपर्यंत फळबाग लागवडीसाठी असलेले अनुकूल वातावरण तयार झाले आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधावर व शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आ. चंद्रकांत जाधवब यांनी १७ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे केली होती. खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आ. जयंत आसगावकर यांनीही पत्राद्वारे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती.

कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगार मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींकडून होणारी मागणी विचारात घेऊन, नियोजन विभागाने (रोहयो) मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रमास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.