कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आता अपस्मार (एपिलेप्सी,फिट्स, मिरगी किंवा झटके) या मेंदूच्या आजारावर योग्य तंत्रज्ञानाबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निदान, उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी व्हिडिओ ई.ई.जी व टेली व्हिडिओ ई.ई.जी सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत दोन शस्त्रक्रियाही हॉस्पिटलमध्ये पार पडल्या आहेत, अशी माहिती बेंगळुरूच्या अॅस्टर हॉस्पिटलचे प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. रवी वर्मा यांनी आज (शनिवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.

अपस्मार हा मेंदूचा आजार असून मेंदूच्या एका भागातून किंवा पूर्ण मेंदूमध्ये अचानक प्रचंड विद्युतलहरी निर्माण होतात. रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता झटका येतो. तर अनेकवेळा शुद्ध हरपते आणि खाली पडल्यामुळे इजा होते. ज्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. जेव्हा दोनपेक्षा जास्त फिट्सचे अॅटॅक काही कारण नसताना येतात तेव्हा त्याला अपस्मार जडला असे सांगितले जाते. व्हिडिओ ई. ई. जी. मध्ये अपस्माराचा झटका येताना रुग्णांच्या मेंदूमधील लहरी आणि रुग्णाचा व्हिडीओ एकत्रितरीत्या तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासला जातो. ज्यामुळे नेमके निदान करणे शक्य होते. या टेस्टमुळे अपस्मार शस्त्रक्रिया सहज शक्य होण्यास मदत होते.

त्यामुळे कोल्हापुरात या आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. यासाठी डॉ. रवी वर्मा महिन्यातून एकदा अॅस्टर आधारमध्ये रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. या वेळी सीईओ डॉ. आनंद मोटे, डॉ. मन्सूरअली सीताबखान, डॉ. रवीश केणी,डॉ. उल्हास दामले, डॉ. अमित माने उपस्थित होते.