तृतीयपंथीयांना उपेक्षेची वागणूक देणे गुन्हाच : दिलशाद मुजावर

0
12

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तृतीयपंथी व्यक्ती या समाजाचाच एक भाग आहे. त्यांना कुठलीही उपेक्षेची वागणूक देणे कायद्याने गुन्हा आहे, असे मत तृतीयपंथी मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत ६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा कालावधी सामाजिक न्याय पर्वाचा एक भाग म्हणून तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण या विषयावर प्रमुख वक्त्या तृतीयपंथी मंडळ सदस्या दिलशाद मुजावर यांचे व्याख्यान, राज्यस्तर व राष्ट्रीय पोर्टल फॉर ट्रान्सजेंडरवरील ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रम हुपरी येथील शेंडुरे महाविद्यालयात झाला.

कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, तृतीयपंथी मंडळ राज्यस्तरावरील सदस्य मयूरीताई आळवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले, उपप्राचार्य शिंदे, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व तृतीयपंथी उपस्थित होते.

दिलशाद मुजावर यांनी  समाजामध्ये असणारी एलजीबीटीक्यू घटकासंदर्भात माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, तृतीयपंथी व्यक्ती संदर्भात असणारे कायदे, अधिनियम त्यांच्यासाठी काम करताना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना येणाऱ्या अडचणी आणि त्या सर्वांवर मात करून समाजाने कोणत्या पद्धतीने त्यांना स्वीकारले पाहिजे. सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. समाजामध्ये या व्यक्तींना सामावून घेण्यासाठी इतरांनी तसेच तृतीयपंथी व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मयूरीताई आळवेकर म्हणाल्या, तृतीयपंथी या समाजाचा भाग असताना येणाऱ्या अडचणी व त्या सोडवताना समाजाने सहकार्य करावे. प्राचार्य भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात तृतीयपंथीयांना राष्ट्रीय पोर्टलवरील ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन सचिन परब यांनी, प्रास्ताविक कल्पना पाटील यांनी केले. सुरेखा डवर यांनी आभार मानले.