मुंबई (प्रतिनिधी) : कित्येक दशके आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर रसिकांचे अलोट प्रेम मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते, ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांच्यावर आज (बुधवार) सायंकाळी जुहू येथील कबरस्तानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देताना असंख्य चाहत्यांना अश्रू अनावर झाले.

काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. परंतू काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री पत्नी सायराबानो उपस्थित होत्या.

दिलीपकुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेसह अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानी जात सायराबानो यांचे सांत्वन केले. आज सायंकाळी ५ वा. जुहू येथील कबरस्तानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.