गडहिंग्लजमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

0
524

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मध्यंतरीच्या काळात रविवार या बाजारादिवशी गडहिंग्लज पोलीस प्रशासनाकडून सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत एकेरी वाहतूक सुरू होती. त्या वेळी गडहिंग्लजची वाहतूक सुरळीत चालू होती. नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक देखील झाले होते. आज (रविवार) मात्र गडहिंग्लजमध्ये वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला.

कोरोनाच्या काळानंतर आज प्रथमच मोठ्या प्रमाणात रविवारचा बाजार भरला होता. या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. उसाची वाहने, मोठे डंपर, बस वाहतूक, तसेच इतर वाहने मुख्य रस्त्यावरूनच जात होती. सर्वसामान्य नागरिकांना रस्ता ओलांडणेदेखील कठीण झाले होते आणि जर पोलीस प्रशासनाने असच दुर्लक्ष केले तर यातून एखादा अपघात होऊन बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे गडहिंग्लज पोलिसांनी पूर्वीप्रमाणे एकेरी वाहतूक नियोजन करून वाहतूक सुरळीत करावी तसेच नागरिकांची या कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.