पेठ वडगाव (प्रतिनिधी) : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून, शेतात ऊसतोडणीची लगबग जोरात सुरू आहे. गळीत हंगामापूर्वी ऊसतोडणीसाठी केलेले करार भंग करून ऊसतोडणी मजुरांनी परिसरातील ट्रॅक्टर मालकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत.

ऊसतोडणी वाहतुकीसाठी ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी आदींची साखर कारखान्यांना गरज असते. त्यासाठी ट्रॅक्टर चालक ऊसतोडणी मजुरांच्या शोधात असतात. उस्मानाबाद, बीड, सोलापूर तसेच कर्नाटकातून ऊसतोडणी मजूर आणले जातात. ऊसतोडणी मुकादम आणि त्यांच्या टोळ्या यांच्यामध्ये करार केले जातात आणि त्यासाठी उचल म्हणून ट्रॅक्टर मालक लाखो रुपयांची रक्कम या टोळ्यांना देतात. ही रक्कम घेतल्यानंतर मात्र ऊसतोडणी टोळ्या व त्यांचे मुकादम गायब झालेले दिसून येतात. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना करार करताना खबरदारी घ्यावी लागत आहे. ऊसतोडणी मजूर व त्यांच्या टोळ्यांच्या या फसवणुकीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

निलेवाडी येथील अंकुश पाटील यांनी यासंदर्भात वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यांनी कागलमधील एका कारखान्याबरोबर करार केला होता. टोळी मुकादमाने सुमारे पाच लाख रुपये उचल घेतली आणि टोळी पळून गेली. असेच प्रकार अन्य ठिकाणी घडले असून, मजुरांनी गंडा घातल्याने एका ट्रॅक्टर मालकाने आत्महत्या केल्याची घटनाही घडली आहे.