टोप (मिलिंद कुशिरे) : सादळे-मादळे येथे गेले ४-५ दिवस रोज बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या कोणाला पहाटेच्या सुमारास रस्त्यावर बसलेला दिसतो, तर कोणाला रात्रीच्या आंधारात दिसतो. स्थानिक लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

यातच बिबट्या एकच आहे की दोन आहेत याची अजुनही खात्री झालेली नाही. पण सध्या या परिसरात पर्यटकांचा वावर पाहायला मिळत आहे. स्थानिक लोक बिबट्या आला आहे, असे सांगत असतानाही, त्याला काय होतेय ?  असेच या पर्यटकांचे बोलणे आहे. तर आज (सोमवार) हेच चित्र असून, पर्यटकांची गर्दी याठिकाणी पहायला मिळत आहे. बिबट्याचा वावर असताना बाहेरील लोक येथे येतातच कसे ? आणि स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

परिसरात बिबट्या वावरत असल्याची माहिती सर्वत्र पसरली असतानाही कोणावर बिबट्याचा हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण ?  वनरक्षक दलाने काहीच दिवसांपूर्वी याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी एक सापळा लावला आहे. पण बिबट्या कधी जेनिसिस कॉलेज जवळ दिसतो, तर कधी कासारवाडीतील शेतात त्याच्या पायाचे ठसे दिसतात. यामुळे नक्की या परिसरात बिबटे आहेत तरी किती, हाच प्रश्न वनरक्षक दलासह नागरिकांना पडला आहे. ते रोज नवनवीन युक्त्या करुन बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत असताना, काही नागरिक बिबट्या पाहायला म्हणून येणाऱ्यांची संख्याही आता वाढत आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अन्यथा कोणावर हल्ला झाला, तर त्याला जबाबदार नक्की कोणाला धरायचे हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.