नागपूर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज (सोमवार) एका प्रकरणात दिला आहे. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल, तर तो लैंगिक अत्याचार होत नाही. ज्यावेळी लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, असेही कोर्टाने म्हटले आहे.  

नागपुरात एका ३९ वर्षीय आरोपीवर एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आरोपीने मुलीला घरी नेऊन छातीला पकडून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. या खटल्यात सत्र न्यायालयाने आरोपीला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींने हायकोर्टात दाद मागितली होती. यावर सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचे संशोधन करत अतिशय महत्वाचे निरीक्षण नोंदवत नागपूर खंडपीठाने आरोपीच्या तीन वर्षांच्या शिक्षेत कपात करून १ वर्षांची शिक्षा सुनावली.