कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ३५, तर पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ६२ असे एकूण ९७ जण आमदारकीसाठी निवडणूक रिंगणात आहेत. आज (बुधवार) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी रिंगणातील उमेदवारांची नावे निवडणूक प्रशासनाने जाहीर केली. त्यात पदवीधरसाठी तीन अधिकृत पक्षाचे आणि उर्वरित ३१ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर (कोल्हापूर), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यानंद माणिकराव मानकर (पुणे), लोकभारती पक्षाकडून जी. के. उर्फ गोरखनाथ किसन थोरात (पुणे), वंचित बहुजन आघाडीकडून सम्राट विजयसिंह शिंदे (शिराळा, सांगली), भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार (मजरेवाडी, सोलापूर) निवडणूक लढवित आहेत. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत (आंबे, पंढरपूर) हे अपक्ष म्हणून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. ‘सुटा’चे प्रा. सुभाष जाधव, ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार, ‘टॅफनॅफ’चे उमेदवार प्रा. नितीन पाटील हे निवडणूक लढवत असल्याने ‘शिक्षक’मध्येही चुरस निर्माण झाली आहे.

‘पदवीधर’मध्ये भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रूपाली पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्यांच्यासह ६२ जण निवडणूक लढवत आहेत. यामुळे ‘पदवीधर’साठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे.