कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने महासैनिक दरबार हॉल, लाईन बाजार कोल्हापूर येथे बुधवार, दि. २९ जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी/कर्मचारी यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहतील. जिल्हा अग्रणी बँक, उद्योग केंद्र, ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, नाबार्ड, राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास यासह विविध महामंडळे आणि विभाग यात सहभागी होणार आहेत.

जिल्ह्यातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित रहावे. विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागांच्या योजनांची सविस्तर माहिती देणार आहेत, असे जिल्हाधिकारी रेखावर यांनी सांगितले.