मुंबई : टोलनाके बंद करण्यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोलनाके बंद करण्याची मागणी करताना राज्य सरकारवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरेंना सुनावले आहे.
मनसे नेते अमेय खोपकर ट्वीट करताना म्हणाले की, राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर 65 टोलनाके बंद झाले होते. आम्ही बोलत नाही तर करुन दाखवतो, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्हाला टोलनाके बंद करायचे का नाही सुचले? धमक नाही तर फुकाची आश्वासने द्यायची कशाला? असे प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केले. असल्या टोलवाटोलवीला लोक कंटाळली आहेत. तेव्हा नुसते बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा, असे आवाहन अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.
पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर खड्डे पडले आहेत. हे दोन महामार्ग बीएमसीकडे दुरुस्तीसाठी दिले आहेत. एमएसआरडीसी रस्त्यावर काडीमात्र काम करत नाही. मुंबईकर एक कर बीएमसीला देते, मग टोलनाक्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून दुसरा कर कशाला? मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय? रस्त्यावर खड्डे असतील तर MSRDC टोल कशाला घेते? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले होते. याशिवाय ते म्हणाले की, घटनाबाह्य सरकार पडल्यानंतर आमचे नवीन सरकार येणार आहे. तेव्हा आम्ही टोल बंद करू, असे आश्वासन देताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.